जिल्हयात १४४ कलम लागू ;आचारसंहितेचा कडक अवलंब
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 ची तारीख 15 ऑक्टोबर 2024 म्हणून जाहीर केली आहे. या जाहीरातीतून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भयपणे आणि न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये विविध बाबींवर निर्बंध आदेश जारी केले आहेत.
लाऊडस्पीकर बंदी, ध्वनीक्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर
कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष किंवा पक्षाचे कार्यकर्ते ध्वनीक्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करू शकणार नाहीत. फिरते वाहन रस्त्यावरून धावत असताना त्यावर ध्वनीक्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पीकरचा वापर सकाळी 6 वाजेपूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश जिल्ह्यासाठी 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू राहतील.
विश्रामगृह वापरावर निर्बंध आणि कार्यालये परिसरातील निर्बंध
निवडणुकीच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, तहसिल कार्यालये, शासकीय कार्यालये आणि विश्रामगृहे याठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा, सभा, उपोषण, सत्याग्रह, घोषणा, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे यासारख्या निवडणूक प्रचारावर प्रतिबंध करण्यात आले आहे. हे आदेश जिल्ह्यासाठी 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू राहतील.
शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक मालमत्तेची विद्रुपता करण्यास निर्बंध
निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपता करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. हा आदेश निर्गमित झाल्यापासून 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू राहील.