भंडारा:
BDCC Bank: बँकेच्या आर्थिक स्थितीला सभासद संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, ज्यामुळे जिल्हा बँक 2005-06 पासून सतत निव्वळ नफ्यात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बँकेने सभासद संस्थांना लाभांश देऊ शकला नाही, परंतु चालू आर्थिक वर्षात बँकेला 450.83 लाख रुपयांचा नफा झाला आहे. यामुळे, यंदा मागील वर्षाच्या प्रमाणे 4 टक्के लाभांश देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 21 वी आमसभा शनिवार, 28 सप्टेंबर रोजी लक्ष्मी सभागृहात पार पडली.
बँकेकडून कर्ज घेताना कायदेशीर करार करणे अनिवार्य.
या आमसभेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे (Sunil Funde) यांनी बँकेच्या कामगिरी आणि भविष्याच्या वाटचालीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बँकेमधील कर्मचार्यांसाठी ‘सॅलरी पॅकेज’ योजनेंतर्गत 30 लाखांपर्यंत अपघात विमा संरक्षण योजना लागू करण्यात आलेली आहे.
बँकेकडून (BDCC Bank) कर्ज घेताना सर्व संबंधित संस्थांना कायदेशीररित्या करार करणे बंधनकारक आहे, आणि त्या करारास संस्थेच्या सर्व संचालक मंडळाची जबाबदारी असते. कोणत्याही अप्रिय प्रसंगी कायदेशीर कार्यवाही झाल्यास सर्व संचालक मंडळावरही कार्यवाही होऊ शकते. त्यामुळे या महत्त्वाच्या बाबींकडे संस्थांनी दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.
सहकारी कायद्यानुसार, 15 मे पर्यंत वार्षिक हिशोब पत्रके सादर करणे अनिवार्य आहे. काही संस्थांनी निर्धारीत वेळेचे पालन केले नाही, तरीही शेतकर्यांच्या सोयीसाठी बँकेने कर्ज पुरवठा सुरू केला. तथापि, शासनाकडून मिळणाऱ्या व्याजाचे प्रस्ताव वेळेवर सादर न केल्यामुळे संस्थांचे आणि बँकेचे नुकसान होते, आणि कधी कधी कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागते. शेतकर्यांना कर्ज वाटप करताना सेवा सहकारी संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई.
संस्थेचे पदाधिकारी शेतकरी सभासदांमधून येत असले तरी गटसचिव दैनंदिन व्यवहार पाहतात. मात्र, अनेक संस्थांतील अवाजवी खर्च, अफरातफर आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे बँकेच्या आणि संस्थेच्या भवितव्यावर गंभीर संकट उभे राहिल्याचे सुनील फुंडे यांनी सांगितले. बँकेला संलग्न 368 सेवा सहकारी संस्थांपैकी चालू वर्षात 333 संस्थांमध्ये अनिष्ट तफावत आहे, ज्याची एकूण रक्कम 111.00 कोटी आहे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या गटसचिवांवर वसुली संदर्भात कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे फुंडे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था भंडारा यांना प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून आर्थिक व्यवहारांची जवाबदारी निश्चित करता येईल. संस्थांनी नियुक्त केलेले स्वतंत्र गटसचिव देखील अवास्तविक खर्चात मागे नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.
बँकेच्या प्रत्येक शाखेची नफ्यात असणे आवश्यक असून, तोट्यातील शाखांचा तोटा समायोजित करून बँक 450.83 लक्ष नफ्यात आहे. परंतु, प्रत्येक शाखेत कर्ज पुरवठ्यात प्रमाणबद्ध वाढ आणि वसुली 100% होणे गरजेचे आहे. बँकेने अद्ययावत सॉफ्टवेअर लागू केले असून उच्च दर्जाचे एटीएम उपलब्ध करून दिले आहेत.
बँकेच्या अपुर्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याची जाणीव असल्याचे फुंडे म्हणाले. मंजूर आकृतीबंधानुसार 468 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना, 31 मार्च 2024 रोजी फक्त 217 कर्मचारी कार्यरत आहेत. आर्थिक स्थिती व ग्राहक सेवा सुरळीत राहण्यासाठी कर्ज पुरवठा, वसुली आणि बँक शाखांची नियमित तपासणी अत्यंत आवश्यक आहे.
सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, बँकेचे सहकारी संचालक, जेष्ठ सहकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सेवा सहकारी संस्थांचे संचालक मंडळ यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. जिल्हा बँक आपल्या सर्वांची आहे, तिचा विकास करणे आणि बँकेला यशाच्या शिखरावर नेणे ही आपली संयुक्त जबाबदारी आहे, असे त्यांनी आमसभेत स्पष्ट केले. यावेळी बँकेचे सर्व संचालक आणि जिल्ह्यातील सभासद संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.