भंडारा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) गंभीर आरोप केला आहे. त्यांनी राहुल गांधींच्या आरक्षणाबद्दलच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भाजपाने खोटा प्रचार सुरु केला आहे, असा दावा केला. पटोले म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही. आरएसएसने आरक्षणाला विरोध केला आहे, आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे.”
भाजपाचा आरक्षणविरोधी चेहरा लपवण्यासाठी कितीही खोटे बोलले तरी त्यांचा खरा विचार उघड होईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले. राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यातील विधानाचा संदर्भ देताना पटोले म्हणाले की, “भाजपाने माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे. राहुल गांधी म्हणाले आहेत की, ‘मी आरक्षण विरोधी नाही, तर आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे,’ हा त्यांचा ठाम विचार आहे.”
काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची स्पष्ट भूमिका आहे की, जातनिहाय जनगणना करावी आणि ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवावी. तथापि, भाजपाचा जातीनिहाय जनगणनेला विरोध असल्याने आरक्षणविरोधी कोण आहे हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची आवश्यकता नाही, असे पटोले म्हणाले.
राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करणारे खलनायक देवेंद्र फडणवीस आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. त्यांनी मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन फडणवीस यांनी या समाजाची फसवणूक केली आहे, असेही ते म्हणाले.