जिल्हा रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी नियमितपणे केली जाते. या तपासणीत भंडारा जिल्ह्यात 132 संशयीत हृदय शस्त्रक्रियेचे लाभार्थी आढळले. यामध्ये 21 लाभार्थी हृदयशस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले, ज्यामध्ये 15 लाभार्थ्यांना दि. 13.09.2024 रोजी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, वर्धा येथे संदर्भित करण्यात आले.
दि. 18.09.2024 रोजी 5 हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. विशेषतः चि. कृष्णाई योगेश ब्राम्हणकर, वय 2 वर्ष, हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तिची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले, पण तिच्या पालकांकडे राशनकार्ड नसल्यामुळे नोंदणी अडचणीत आली.
तथापि, डॉ. दिपचंद सोयाम, डॉ. अतुलकुमार टेंभुणै, आणि आरोग्य तपासणी पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे कृष्णाईची शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वीरित्या पार पडली. सद्यस्थितीत कृष्णाईची प्रकृती चांगली आहे, आणि तिच्या आई-वडिलांनी जिल्हा शल्य चिकित्सकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.