भंडारा
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार शिशुपाल पटले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली आहे. विदर्भातील ज्येष्ठ नेते शिशुपाल पटले यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. अनेक वर्षे भाजपामध्ये सक्रिय राहिल्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शिशुपाल पटले गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत त्यांना व्यापक ज्ञान आहे, आणि त्यांनी वेळोवेळी सभागृहात तसेच आंदोलने करून शेतकऱ्यांच्या समस्यांना शासनासमोर ठेवले आहे. तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार गावचे सरपंच म्हणून त्यांनी 1994 ते 1997 या काळात काम केले. त्यानंतर ते 1997-1998 दरम्यान भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 2000 ते 2005 या कालावधीत त्यांनी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून जबाबदारी पार पाडली, आणि 2004 ते 2009 या काळात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार म्हणून काम केले.
त्यानंतर, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि किसान प्रदेश मोर्चाचे महासचिव म्हणून संघटनात्मक कार्य केले. शिशुपाल पटले यांची सरचिटणीस पदावर निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय नानाभाऊ पटोले यांना दिले असून भंडारा-गोंदिया जिल्हा तसेच राज्याच्या विविध प्रश्नांवर सरकारकडे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.