अभिजीत बिचुकलेंनी काही दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीसाठी दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे.
अभिजीत बिचुकले संपत्ती: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार आहे, आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी संघर्ष पाहायला मिळेल. महाराष्ट्रात अनेक हायव्होल्टेज लढती सुरू आहेत, त्यातल्या एक आहे बारामती मतदारसंघात होणारी लढत. येथे अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात जोरदार स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून बिग बॉस मराठीतून प्रसिद्ध झालेले अभिनेता अभिजीत बिचुकले यानेही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्याच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात श्रीमंतीचा दिखावा करणाऱ्या अभिजीत बिचुकलेंच्या संपत्तीबद्दल अनेकांचा अंदाज होता की ती कोट्यवधींच्या घरात असेल. मात्र, अभिजीत बिचुकलेंनी निवडणूक शपथपत्रात जाहीर केलेल्या माहितीनुसार, त्यांची संपत्ती केवळ काही हजारांच्या घरात आहे. अभिजीत बिचुकलेंनी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आणि शपथपत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली आहे.
अभिजीत बिचुकलेंची संपत्ती किती आहे?
त्यांच्या शपथपत्रानुसार, अभिजीत बिचुकले यांच्या संपत्तीत २०१९ च्या तुलनेत घट झाली आहे. २०१९ मध्ये त्यांची संपत्ती ७८,५०३ रुपये होती, आणि आता ती ७२,५०० रुपये झाली आहे. तसेच, त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची स्थावर संपत्ती नाही. अभिजीत बिचुकले यांचे शिक्षण बी.ए. ऑनर्सपर्यंत झाले आहे, आणि त्यांच्यावर एक प्रलंबित गुन्हा नोंदवलेला आहे.
कोण आहेत अभिजीत बिचुकले?
अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवून राज्यभर चर्चेत आले. अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ते स्वतःला कवी मानतात आणि नगरसेवकापासून राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकांपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्धही अनेकवेळा निवडणूक लढवली आहे.
बिग बॉसच्या घरात त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली, टास्क खेळताना नियमांचे उल्लंघन केले आणि महिला सदस्यांसोबत फर्ल्ट केल्यामुळे ते चर्चेत राहिले. या वादग्रस्त घटनांमुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली. अभिजीत बिचुकले यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध वरळीत निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.