भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या नेत्यांनी फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्नाटक सरकारविरुद्ध खोटी माहिती पसरवली आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केली, असा आरोप केला आहे.
कर्नाटकातील मांड्या येथे गणेश विसर्जनाच्या दरम्यान पोलिसांनी गणेश मूर्ती पोलिस व्हॅनमध्ये ठेवले असल्याचा फोटो व्हायरल झाला. यासोबतच कर्नाटक सरकारने गणेश पूजेवर बंदी घातल्याचा दावा करण्यात आला. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, गणेश पूजेवर कोणतीही बंदी नाही. ताब्यात घेतलेल्या लोकांना पोलिसांनी नियंत्रित करण्यासाठी मूर्ती उचलली होती, आणि नंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
यावरून काँग्रेस कमिटीने आरोप केला आहे की, या लोकप्रतिनिधींनी खोटी माहिती पसरवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर नोंदविण्याची विनंती केली आहे. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, युती सरकारच्या या प्रयत्नांविरुद्ध त्यांनी आवाज उठवण्याचे ठरवले आहे.
या संदर्भात भंडारा जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात माजी आमदार अनिल बावनकर, जिल्हा महिला अध्यक्ष जयश्री बोरकर यांचा समावेश होता. यावर विचार विनिमय करण्यात आला आणि त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली.