आजच्या डिजिटल आणि स्पर्धात्मक युगात अनुभव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप करणं गरजेचं झालं आहे. मात्र याच गरजेचा गैरफायदा घेत काही बनावट संस्था व कंपन्या विद्यार्थ्यांकडून २००० ते 7००० रुपये फी आकारून फसवणूक करत आहेत. अशा स्कीम्समध्ये ना नीट काम दिलं जातं, ना मार्गदर्शन, आणि ना खऱ्या अर्थाने अनुभव मिळतो. काही संस्था फक्त फॉर्म भरवून पैसे घेतात आणि नंतर विद्यार्थ्यांचा संपर्कही ठेवत नाहीत.
या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच, पण त्यांचं मानसिक दडपणही वाढतं. त्यामुळे अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय योजणं गरजेचं आहे:
- MCA पोर्टलवर कंपनीची नोंदणी तपासा: mca.gov.in या संकेतस्थळावर कंपनी नोंदणीकृत आहे का, ती सक्रिय आहे का, हे पाहावं.
- कंपनीची वेबसाईट आणि स्पॅम स्कोअर तपासा: वेबसाइट व्यावसायिक वाटते का, तिचा ScamAdviser.com वर ट्रस्ट स्कोअर काय आहे हे तपासावं.
- गुगल न्यूज आणि रिव्ह्यू पाहा: त्या संस्थेविषयी काही नकारात्मक बातम्या किंवा विद्यार्थ्यांचे तक्रारी आहेत का, हे तपासा.
- LinkedIn वर कंपनी प्रोफाइल आणि कर्मचारी चेक करा: कंपनी व त्याचे कर्मचारी खरे आहेत का, हे खात्री करून घ्या.
इंटर्नशिप ही शिकण्याची संधी आहे – ती पैसे देऊन विकत घेण्याची गोष्ट नाही. योग्य माहिती व जागरूकतेमुळे अशा स्कॅमपासून बचाव होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी सजग राहणं हीच यावरची खरी उपाययोजना आहे