धाराशिव: मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात चप्पल घालून प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी, अपक्ष उमेदवार गुरूदास कांबळे यांचे निवेदन
धाराशिव: मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात चप्पल वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी परंडा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने केली आहे. परंडा मतदारसंघातील उमेदवाराचे चिन्ह चप्पल असल्याने आचारसंहितेचे पालन होण्यासाठी हे निवेदन दिल्याचे अपक्ष उमेदवार गुरूदास संभाजी कांबळे यांनी स्पष्ट केले.२४३ परंडा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असलेले गुरूदास संभाजी कांबळे यांनी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात चप्पल घालून प्रवेश केल्यास आचारसंहिता भंग होण्याची शक्यता लक्षात घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक निवेदन सादर केले आहे.
चप्पल निशाणी असलेल्या कांबळे यांची आचारसंहितेच्या पालनाची काळजी, २०० मीटर परिसरात प्रचारावर बंदी घालण्याची मागणी
कांबळे यांचे मतदान मशीनवरील मतानुक्रमांक १२ असून त्यांची निशाणी चप्पल आहे. आदर्श आचारसंहिता नियमांनुसार, मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह किंवा प्रचार प्रदर्शित करण्यावर सक्त बंदी आहे.आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यात ते म्हणाले आहेत, “माझ्या निशाणीसंबंधी कोणत्याही प्रकारचा प्रचार मतदान केंद्राच्या २०० मीटरच्या आत होऊ नये याची मी स्वतः काळजी घेईल. तरीही, जर मतदान बूथच्या २०० मीटरच्या आत चप्पल घालून कोणतेही कर्मचारी, उमेदवार, पदाधिकारी किंवा मतदार प्रवेश करत असेल, तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी.
चप्पल घालून मतदान केंद्रात प्रवेशावर अडचणीची स्थिती, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय महत्त्वाचा
तुम्ही मतदानाच्या दिवशी कोणतीही अव्यवस्था होईल, याची दक्षता घेण्याची आणि आचारसंहिता पाळण्याची सर्व संबंधित पक्षांनी वचनबद्ध असावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.या अनोख्या मागणीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह मतदान अधिकारी, कर्मचारी आणि नेत्यांसमोर मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता प्रश्न असा आहे की, मतदान केंद्रात कर्मचारी, पदाधिकारी, आणि मतदारांना चप्पल घालून प्रवेश मिळणार का? किंवा २०० मीटर परिसरातून चप्पल काढून मतदान केंद्रात प्रवेश मिळवता येणार का, हे पाहावे लागणार आहे.